Wednesday, June 17, 2020

तू बोल रे गड्या भीती कोणाची.. पर्वा कोणाची??


दिवस तसा रोजच्या सारखाच. कोरोनामूळ लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मूळ वर्क फ्रॉम होम. नेहमीच रुटीन . दुपारची वेळ. जेवण झाल्यानंतर नेहमीच्या सुस्तीत होते.. तेवढ्यात व्हाट्स'अँप नोटिफिकेशन आलं. 'सुशांत सिंग गेला. suicide केली'. विश्वासच नाही  बसला. पटकन  बातम्या चालू केल्या. समोर  TV वर तीच बातमी दाखवली जात होती. अंगावर काटाच उभा राहिला.

सुशांतची तशी मी काही जबरदस्त फॅन आहे असा भाग नाही. पण छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पोहचल्याबद्दल आदर आणि सुशांतच्या वेगवेगळ्या भूमिकेबद्दल  विशेषतः एम एस धोनी मध्ये  साकारलेला धोनी आणि छिछोरे मधला ''तुम्हारा रिझल्ट डिसाइड नहीं करता है की तुम लूज़र हो कि नहीं ...तुम्हारी कोशिश तय करती है'' म्हणत मुलाला जगण्याची उमेद देणारा अनिरुद्ध बघितल्यावर वाटायचं, चला nepotism तोडणारा अजून एक आला..

हा दिसायला इतका देखणा.  Acting एवढी चांगली. डान्स उत्कृष्ट. करियर च्या सुरुवातीलाच भूमिकेमधील विविधता, जबरदस्त फॅन फॉलोअर्स. ह्यानी का आत्महत्या केली असेल. बातमी बघितल्यावर काम पण काही सुचेना. डोकं पण सुन्न झालेलं. लॅपटॉप तसाच बंद करून उठले.

सुशांतच्या बातमीमुळं मन भूतकाळात गेलं. प्रसंग पहिला.  शाळेतली गोष्ट. मैत्रिणीच्या चुलत भावाने कमी मार्क्स मिळाल्यामुळं आत्महत्या केली. पाचवीतल्या मुलाला कसला एवढा दबाव. एकुलता एक मुलगा. आई वडिलांना त्यातून बाहेर पडायला किती तरी वर्षे गेली. दर रक्षाबंधनाला माझी मैत्रीण एक राखी बाजूला ठेवायची. त्याच्यासाठी....  शाळा सुटली. अनेक वर्षे गेली.  त्यानंतर कधीही आमची भेट झाली की तिला विचारायचे. 'कसे आहेत ग तुझे काका काकू?'. उत्तर नेहमीचंच . 'सावरायचा प्रयत्न तर करत आहेत. पण इतकी वर्षे उलटून ही परिस्तिथी मध्ये जास्त फरक नाही पडला गं'.

प्रसंग दुसरा. ऑफिस कामानिम्मित काही दिवस एका क्लायंट ऑफिस ला होते.  थोडीफार ओळख झाली लोकांशी . त्यात एक सर होते. ऐकण्यात आले होते की त्यांच्या बायकोनं गेल्या वर्षी आत्महत्या केली, एके दिवशी बोलता बोलता माझ्या जवळ सांगितलं त्यांनी. 'एक वर्षाचा मुलगा टाकून माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली.' सर तसे personally ठीक च होते. निदान बायको ला त्रास देणाऱ्यातले तरी नाही वाटले. त्यांच्या सासूबाईंचे मानसिक आजारावर चालू असलेले उपचार आणि  बायकोच इतके शांत वागणं हे सगळे संकेत होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळताना बघून मी एवढेच बोलून उठले 'सर एकदा संवाद साधायला हवा होता. मान्य आहे स्वतःहून त्या कधी बोलल्या नाहीत पण तुम्ही पुढाकार घ्यायला हवा होता. आज कदाचित परिस्थिती वेगळी असती आणि त्या लेकराजवळ त्याच्या हक्काची आई असती '...

प्रसंग तिसरा. जवळपास एक वर्ष झाले असेल ह्या गोष्टीला. एका मैत्रिणीचा अचानक फोन आला. 'कल्याणी, मला जीव देऊ वाटत आहे. तुझ्याशी शेवटचं बोलावं म्हणून कॉल केला.' तिचं हे वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण ती वेळ गांगरून जाण्यापेक्षा तिला सावरून घ्यायची होती. माझ्या मनात शंभर प्रश्न उभे राहिले. 'हि दिसायला चांगली. चुणचुणीत. करियर मध्ये बऱ्याच लोकांचा आदर्श . हीला कसले एवढे टेन्शन आहे की जीव देऊ वाटत आहे?' कुठून सुरुवात करू काही समजत नव्हतं. 'तू बोल मनीषा. मी ऐकतेय'. इतकेच बोलले. तिनं बोलायला चालू केलं. ३-४ वर्षांचं तीच त्याच्याशी रेलेशनशिप. घरच्यांचा नकार.  ऐनवेळी मुलाच पाठ फिरवणं. आणि त्यांचं ब्रेकअप. सगळे काही बोलली.
मी : 'अगं. ज्याच्यामुळे तू असा विचार करतेय त्याला कितपत फरक पडेल मला नाही माहित पण ज्यांनी तुला जन्म दिलाय आणि तुझ्या जाण्याने ज्यांना फरक पडेल त्यांचा विचार कर.  इथं पर्यंत पोहचण्यासाठी केलेलं कष्ट आठव. आयुष्य जगाल तर खरंच खूप सुंदर आहे गं'.


प्रसंग चवथा. माझा छोटा भाऊ रोहन. त्याचा एक मित्र होता इंजिनीरिंग मध्ये. सुजय. इंजिनीरिंगच पहिलं वर्ष भल्या भल्याना जड जात. सुजयचे हि तसेच झालं. बरेच विषय गेले. ATKT मध्ये पहिलं वर्ष सुटले खरं. पण दुसरे वर्ष, मागचे विषय भरून काढता काढता सपशेल फेल. घरची परिस्तिथी बेताचीच. शेती नावाला. दुष्काळ. आई-वडीलच दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून सुजय ला पैसे पाठवायचे. आई वडिलांना तोंड कसे दाखवणार म्हणून, सुजय आत्महत्या करायला जातो. वेळीच रोहनचं लक्ष जात . एक कानशिलात लावून जाब विचारतो. 'फेल झालं की आत्महत्या करायची? पैसाचं टेन्शन असेल तर फी मी भरेल. नोकरी मिळाल्यावर हवे तर परत कर. काही घाई नाही आपल्याला. तू परत जोमाने अभ्यास चालू कर' म्हणत धीर देतो..

मन अजूनही भूतकाळातच होतं. व्हॉट'स अँप च्या मेसेज नि तंद्री भंगली. २ मिनिटं विचार केला. माझ्या मैत्रिणीनं त्या दिवशी मला कॉल केला नसता तर. रोहन ने सुजयला suicide करताना पहिले नसते तर. पुढे विचार करवेना. जीव घेण्याचा विचार, लोकं अचानक नाही करत. कुठेतरी मानसिक दबावामुळं , मनाचा  कोंडमारा झालेला असतो. जसा शरीराला ताप येतो तसेच मनाचं पण असतं. मानसिक आरोग्य कुठेतरी बिघडत जातं.  म्हणून ती लोकं काही वेडी नसतात. पण लोकांची संकुचित वृत्ती. काय बोलणार....  कोणी सर्जन होताना दिसले तर त्यांचं आपण कौतुक करतो. पण 'मी लोकांच्या मनापर्यंत पोहचून त्यांचे आजार बरे करणार ' म्हणत मानसोपचरतज्ज्ञ (Psychiatrist) होणारं कोणी दिसले की 'वेड्यांचा डॉक्टर होणार का तू?'  म्हणून खिल्ली उडवणारे पण आपणच.. आपल्या आजू बाजूला अशी  सुशांत , सरांची पत्नी, मनीषा, सुजय सारखे  अगणित  लोक आजूबाजूला वावरत असतात जे मानसिक त्रासातून जात असतात . त्यांच्या वागण्यातला फरक ओळखा. शांतता, एक्कलकोंडेपणा मागचे कारण शोधा. त्यांच्याबद्दल गॉसिप करत बसण्यापेक्षा, 'कसा आहेस? कशी आहेस? All Okay?', एवढा तरी एक आपुलकीचा प्रश्न विचारा.

मनिषाने वेळ असतानाच कोणासमोर तरी मन मोकळं केल्यामुळ, आज ती happily married आहे आणि तो सुजय जो परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करायला निघाला होता, तो आज एका टॉप IT कंपनी मध्ये  नोकरी करत आहे. नंतर त्यानं घर बांधलं. आणि आईवडिलांचं सगळे कर्ज ही फेडले.

प्रत्येकालाच काही ना काही  मानसिक त्रास असतो. तो मानसिक त्रास मोठं रूप घेण्याआधी, वेळीच मनातले टेन्शन कुठेतरी मोकळे करावं. आई वडिलांशी बोलू शकत नसाल तर मित्र मैत्रिणीं संवाद साधा. शिक्षकांशी बोला. कधी कधी जवळच्या लोकांनी  judge करण्याची भीती असते. गॉसिप चा टॉपिक बनायची भीती असते.  ती भीती अनोळखी माणसासोबत मन मोकळे करण्यात नसते. मान्य आहे अनोळखी माणसासोबत कसे बोलायचं पण कधी कधी तिथेही सोलुशन मिळते. आणि हे हि नसेल करू शकत तर बिनधास्त देवासमोर बसून मनमुराद गप्पा मारा. व पु काळेंनी म्हंटल आहे, 'प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.' म्हणूनच शेवटचं पाऊल उचलण्याआधी फक्त एकदा विचार करा. जीव गेला तिथं सगळेच संपले. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जन्मदात्यांच काय? ज्यांचा तुमच्यावर जीव आहे त्यांचं काय?  कधी कधी अथक प्रयत्नांसमोर नशीब सुद्धा हरते. म्हणून फक्त एकदा, एकदा तरी जगाशी बोलायचं प्रयत्न करा.

Popular posts from this author