Tuesday, September 17, 2019

प्रवास आठवणींचा

आज बर्‍याच दिवसांनी पुस्तकांचं कपाट आवरायला घेतलं. बॅकग्राउंड मध्ये माझ्या नेहमीच्या प्ले लिस्ट मधील गाणी वाजत होती. पुस्तकांवर साठलेली धूळ पुसत पुसत एक-एक पुस्तक कपाटात ठेवत होते. आवरता आवरता माझी नजर 'द अल्केमिस्ट' पुस्तकावर खिळली. योगायोगाने त्याच वेळी 'साथिया' सिनेमाचं शीर्षक गीत चालू झालेलं.

मी शाळेत असताना रिलीज झालेला हा मूवी. ए आर रहमान ची फॅन मी होतेच पण ह्या मूवी नंतर ते आजकाल डाय हार्ड फॅन वगैरे म्हणतात ना तशीच काहीतरी माझी अवस्था झालेली. त्या मूवी ची कॅसेट मला पाहिजे होती पण आमच्या मातोश्रींनीकडे असल्या 'फालतू' लाडासाठी पैसे नव्हते. डाय हार्ड फॅनच ती मी. कसेतरी करून एक- एक रुपया साठवून  'साथिया' साठी मी 52 रुपये जमा केलेच.

इंजिनीरिंग मध्ये असताना द अल्केमिस्ट पुस्तक वाचले होते. मराठी अनुवादित. मराठी मिडीयम च्या मला आजच्या इतकं इंग्लिश तेव्हा समजत नव्हतं.🙂  इंग्लिश आवृत्ती अजून चांगली असेल म्हणून इंग्लिश आवृत्ती विकत घ्यायची ठरवली. अबब!! किंमत होती 150 रुपये!!

माझ्या शिक्षणाचा खर्च आधीच वडिलांना डोईजड झालेला. त्यात त्यांना अभ्यासक्रमाच्या बाहेरील पुस्तकासाठी कसे पैसे मागणार?? खूप विचार केल्यानंतर युक्ती सुचली. चहाला एक-दोन महिने रामराम ठोकला तर त्यात पुस्तक येऊ शकेल. अशा पद्धतीने संपूर्ण दीड महिना चहाचं तोंड न बघितलेल्या माझ्या पदरी शेवटी 'अल्केमिस्ट' पडलंच..


आज कॅसेट चा जमाना गेला. सीडी आणि gaana.com च वारं चालू आहे. पुस्तकांच्या बाबतीतही तसंच. इ-बुक लोकांना जवळच वाटू लागलंय. माझाही रोल चेंज झाला. Student पासून Employee झाले.आज वाटेल तेव्हा पाहिजे ते पुस्तक आणि सीडी, subscription विकत घेऊ शकते पण वडिलांनी चहा-नाश्ता साठी दिलेले पैसे वाचवून, भूक मारून  'ते' पुस्तक आणि 'ती' कॅसेट विकत घेतल्याचा आनंद काही औरच आहे..

कम्फर्ट झोन

 'The monk who sold his Ferrari' वाचण्याआधी त्याचा सारांश वाचत होते. वाचता-वाचता एका ओळीवर थांबले. "जब आप अपने कम्फर्ट झोन से बाहर निकलते जाते है, तो एक समय भयभीत करनेवाला काम आपके बाय हात का खेल बना बन जाता है ". माझ्यासाठी तरी ते तंतोतंत लागू होत होतं.

 नवीन मैत्रीण बनवायची म्हटली तरी ती माझ्या सारखीच साधी  हवी. गबाळी चालेल.पण स्टायलिश नको. तो माझा कम्फर्ट झोन नाही. दोन-तीन महिने माझ्या cubicle मध्ये बसणाऱ्या मुलांची नावे सुद्धा मला माहीत नव्हती.. टिफिन मध्ये काही आणलं तर मैत्रीणीला म्हणायचे. तु वाट ना 'त्या' लोकांना. ती नसली की टीफीन परत जायचा.लग्नाच्या प्रपोजल साठी पण भैय्याला म्हणायचे 'तु किंवा मैत्रिण सोबत असेल तरच भेटेल. मी एकटी कम्फर्टेबल नाही. नाहीतर सरळ नकार कळव."

गाण्यांच्या प्ले लिस्ट मध्ये 'Add to favourite' असतं तसंच माझं होतं.. 'Not comfortable' कायम favorite word.

 करियर मध्ये पण तसंच. कॅपजेमिनी मधून अमेरिकेच्या प्रोजेक्टसाठी सिलेक्ट झालेले. वर्षातून दोनदा तीनदा तरी जावे लागणार होते. आयटी वाल्यांसाठी US visa हा करिअरचा माइलस्टोन असतो. मला स्वतःहून संधी आली होती तर मी परदेशात जाणं माझ्या 'कम्फर्ट झोन' मध्ये नव्हतं म्हणून मॅनेजरला नकार घंटा कळवली.

कम्फर्ट झोनच्या नावाखाली मी 'कैदेत' वावरत होते. चाकोरी बाहेरच्या लोकांशी बोलण्याची, चार चौघांत मते मांडण्याची, परदेशात आपलं कोणी सोबत नसताना राहण्याच्या 'भीतीच्या'  कैदेत.. बोन्साय केलं  कुंडीतील वडाचं झाड असतं ना तसंच माझं होतं. कुंडी एवढेच विश्व. कम्फर्ट झोन Fear झोन झालेला. आणि त्यामुळे मी कधीही Growth झोन मध्ये पाऊल टाकू शकले नाही. स्वतःची बौद्धिक प्रगती तर खुंटली होती त्यासोबत वैयक्तित ही खुंटवली होती.

हळूहळू कम्फर्ट झोन तोडायचं ठरवलं.सुरुवात ऑफिसमधल्या प्रोजेक्ट पासून केली. फ्रान्स टू इंडिया coordination वाढवलं.नवनवीन जबाबदार्‍या अंगावर घेतल्या. आव्हानांना भिडले. 'Your way is good but I would like to discuss coin's another side'  म्हणून चारचौघांत स्वतःची मते मांडायला शिकले. वेळ आली तर माझी तयारी आहे फ्रान्सला जायची, स्वतःहून बोलले. नवीन लोकांशी ओळखी वाढवल्या. जेव्हा कम्फर्ट झोन सोडला तेव्हा आत्मविश्वास पण  आपोआप वाढला. तरीही  कॅन्टीन मध्ये एकटीने चहा प्यायचा फियर झोन मात करायचा राहिलाच आहे.. 🙂

माझ्यासारख्या कम्फर्ट झोन मध्ये वावरणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छिते की स्वतःला अज्ञात विश्वात झोकून द्या. अशक्य असे काही नसतं.. असते ती फक्त भीती.. अश्या गोष्टी धैर्याने करायला घ्या. थोडं बंडखोर  बनून कम्फर्ट झोनच्या भिंती तोडायला शिका. मग बघा यश कसं आपोआपच मिळत जाईल.



Popular posts from this author