Wednesday, June 17, 2020

तू बोल रे गड्या भीती कोणाची.. पर्वा कोणाची??


दिवस तसा रोजच्या सारखाच. कोरोनामूळ लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मूळ वर्क फ्रॉम होम. नेहमीच रुटीन . दुपारची वेळ. जेवण झाल्यानंतर नेहमीच्या सुस्तीत होते.. तेवढ्यात व्हाट्स'अँप नोटिफिकेशन आलं. 'सुशांत सिंग गेला. suicide केली'. विश्वासच नाही  बसला. पटकन  बातम्या चालू केल्या. समोर  TV वर तीच बातमी दाखवली जात होती. अंगावर काटाच उभा राहिला.

सुशांतची तशी मी काही जबरदस्त फॅन आहे असा भाग नाही. पण छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पोहचल्याबद्दल आदर आणि सुशांतच्या वेगवेगळ्या भूमिकेबद्दल  विशेषतः एम एस धोनी मध्ये  साकारलेला धोनी आणि छिछोरे मधला ''तुम्हारा रिझल्ट डिसाइड नहीं करता है की तुम लूज़र हो कि नहीं ...तुम्हारी कोशिश तय करती है'' म्हणत मुलाला जगण्याची उमेद देणारा अनिरुद्ध बघितल्यावर वाटायचं, चला nepotism तोडणारा अजून एक आला..

हा दिसायला इतका देखणा.  Acting एवढी चांगली. डान्स उत्कृष्ट. करियर च्या सुरुवातीलाच भूमिकेमधील विविधता, जबरदस्त फॅन फॉलोअर्स. ह्यानी का आत्महत्या केली असेल. बातमी बघितल्यावर काम पण काही सुचेना. डोकं पण सुन्न झालेलं. लॅपटॉप तसाच बंद करून उठले.

सुशांतच्या बातमीमुळं मन भूतकाळात गेलं. प्रसंग पहिला.  शाळेतली गोष्ट. मैत्रिणीच्या चुलत भावाने कमी मार्क्स मिळाल्यामुळं आत्महत्या केली. पाचवीतल्या मुलाला कसला एवढा दबाव. एकुलता एक मुलगा. आई वडिलांना त्यातून बाहेर पडायला किती तरी वर्षे गेली. दर रक्षाबंधनाला माझी मैत्रीण एक राखी बाजूला ठेवायची. त्याच्यासाठी....  शाळा सुटली. अनेक वर्षे गेली.  त्यानंतर कधीही आमची भेट झाली की तिला विचारायचे. 'कसे आहेत ग तुझे काका काकू?'. उत्तर नेहमीचंच . 'सावरायचा प्रयत्न तर करत आहेत. पण इतकी वर्षे उलटून ही परिस्तिथी मध्ये जास्त फरक नाही पडला गं'.

प्रसंग दुसरा. ऑफिस कामानिम्मित काही दिवस एका क्लायंट ऑफिस ला होते.  थोडीफार ओळख झाली लोकांशी . त्यात एक सर होते. ऐकण्यात आले होते की त्यांच्या बायकोनं गेल्या वर्षी आत्महत्या केली, एके दिवशी बोलता बोलता माझ्या जवळ सांगितलं त्यांनी. 'एक वर्षाचा मुलगा टाकून माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली.' सर तसे personally ठीक च होते. निदान बायको ला त्रास देणाऱ्यातले तरी नाही वाटले. त्यांच्या सासूबाईंचे मानसिक आजारावर चालू असलेले उपचार आणि  बायकोच इतके शांत वागणं हे सगळे संकेत होते. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळताना बघून मी एवढेच बोलून उठले 'सर एकदा संवाद साधायला हवा होता. मान्य आहे स्वतःहून त्या कधी बोलल्या नाहीत पण तुम्ही पुढाकार घ्यायला हवा होता. आज कदाचित परिस्थिती वेगळी असती आणि त्या लेकराजवळ त्याच्या हक्काची आई असती '...

प्रसंग तिसरा. जवळपास एक वर्ष झाले असेल ह्या गोष्टीला. एका मैत्रिणीचा अचानक फोन आला. 'कल्याणी, मला जीव देऊ वाटत आहे. तुझ्याशी शेवटचं बोलावं म्हणून कॉल केला.' तिचं हे वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण ती वेळ गांगरून जाण्यापेक्षा तिला सावरून घ्यायची होती. माझ्या मनात शंभर प्रश्न उभे राहिले. 'हि दिसायला चांगली. चुणचुणीत. करियर मध्ये बऱ्याच लोकांचा आदर्श . हीला कसले एवढे टेन्शन आहे की जीव देऊ वाटत आहे?' कुठून सुरुवात करू काही समजत नव्हतं. 'तू बोल मनीषा. मी ऐकतेय'. इतकेच बोलले. तिनं बोलायला चालू केलं. ३-४ वर्षांचं तीच त्याच्याशी रेलेशनशिप. घरच्यांचा नकार.  ऐनवेळी मुलाच पाठ फिरवणं. आणि त्यांचं ब्रेकअप. सगळे काही बोलली.
मी : 'अगं. ज्याच्यामुळे तू असा विचार करतेय त्याला कितपत फरक पडेल मला नाही माहित पण ज्यांनी तुला जन्म दिलाय आणि तुझ्या जाण्याने ज्यांना फरक पडेल त्यांचा विचार कर.  इथं पर्यंत पोहचण्यासाठी केलेलं कष्ट आठव. आयुष्य जगाल तर खरंच खूप सुंदर आहे गं'.


प्रसंग चवथा. माझा छोटा भाऊ रोहन. त्याचा एक मित्र होता इंजिनीरिंग मध्ये. सुजय. इंजिनीरिंगच पहिलं वर्ष भल्या भल्याना जड जात. सुजयचे हि तसेच झालं. बरेच विषय गेले. ATKT मध्ये पहिलं वर्ष सुटले खरं. पण दुसरे वर्ष, मागचे विषय भरून काढता काढता सपशेल फेल. घरची परिस्तिथी बेताचीच. शेती नावाला. दुष्काळ. आई-वडीलच दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून सुजय ला पैसे पाठवायचे. आई वडिलांना तोंड कसे दाखवणार म्हणून, सुजय आत्महत्या करायला जातो. वेळीच रोहनचं लक्ष जात . एक कानशिलात लावून जाब विचारतो. 'फेल झालं की आत्महत्या करायची? पैसाचं टेन्शन असेल तर फी मी भरेल. नोकरी मिळाल्यावर हवे तर परत कर. काही घाई नाही आपल्याला. तू परत जोमाने अभ्यास चालू कर' म्हणत धीर देतो..

मन अजूनही भूतकाळातच होतं. व्हॉट'स अँप च्या मेसेज नि तंद्री भंगली. २ मिनिटं विचार केला. माझ्या मैत्रिणीनं त्या दिवशी मला कॉल केला नसता तर. रोहन ने सुजयला suicide करताना पहिले नसते तर. पुढे विचार करवेना. जीव घेण्याचा विचार, लोकं अचानक नाही करत. कुठेतरी मानसिक दबावामुळं , मनाचा  कोंडमारा झालेला असतो. जसा शरीराला ताप येतो तसेच मनाचं पण असतं. मानसिक आरोग्य कुठेतरी बिघडत जातं.  म्हणून ती लोकं काही वेडी नसतात. पण लोकांची संकुचित वृत्ती. काय बोलणार....  कोणी सर्जन होताना दिसले तर त्यांचं आपण कौतुक करतो. पण 'मी लोकांच्या मनापर्यंत पोहचून त्यांचे आजार बरे करणार ' म्हणत मानसोपचरतज्ज्ञ (Psychiatrist) होणारं कोणी दिसले की 'वेड्यांचा डॉक्टर होणार का तू?'  म्हणून खिल्ली उडवणारे पण आपणच.. आपल्या आजू बाजूला अशी  सुशांत , सरांची पत्नी, मनीषा, सुजय सारखे  अगणित  लोक आजूबाजूला वावरत असतात जे मानसिक त्रासातून जात असतात . त्यांच्या वागण्यातला फरक ओळखा. शांतता, एक्कलकोंडेपणा मागचे कारण शोधा. त्यांच्याबद्दल गॉसिप करत बसण्यापेक्षा, 'कसा आहेस? कशी आहेस? All Okay?', एवढा तरी एक आपुलकीचा प्रश्न विचारा.

मनिषाने वेळ असतानाच कोणासमोर तरी मन मोकळं केल्यामुळ, आज ती happily married आहे आणि तो सुजय जो परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करायला निघाला होता, तो आज एका टॉप IT कंपनी मध्ये  नोकरी करत आहे. नंतर त्यानं घर बांधलं. आणि आईवडिलांचं सगळे कर्ज ही फेडले.

प्रत्येकालाच काही ना काही  मानसिक त्रास असतो. तो मानसिक त्रास मोठं रूप घेण्याआधी, वेळीच मनातले टेन्शन कुठेतरी मोकळे करावं. आई वडिलांशी बोलू शकत नसाल तर मित्र मैत्रिणीं संवाद साधा. शिक्षकांशी बोला. कधी कधी जवळच्या लोकांनी  judge करण्याची भीती असते. गॉसिप चा टॉपिक बनायची भीती असते.  ती भीती अनोळखी माणसासोबत मन मोकळे करण्यात नसते. मान्य आहे अनोळखी माणसासोबत कसे बोलायचं पण कधी कधी तिथेही सोलुशन मिळते. आणि हे हि नसेल करू शकत तर बिनधास्त देवासमोर बसून मनमुराद गप्पा मारा. व पु काळेंनी म्हंटल आहे, 'प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.' म्हणूनच शेवटचं पाऊल उचलण्याआधी फक्त एकदा विचार करा. जीव गेला तिथं सगळेच संपले. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जन्मदात्यांच काय? ज्यांचा तुमच्यावर जीव आहे त्यांचं काय?  कधी कधी अथक प्रयत्नांसमोर नशीब सुद्धा हरते. म्हणून फक्त एकदा, एकदा तरी जगाशी बोलायचं प्रयत्न करा.

Friday, January 3, 2020

एक घास चिऊ चा ....

लग्नाला एक वर्ष होऊन गेलेलं.  दोघांना चाहूल लागली छोट्या नवीन पाहूण्याची. दोघांत आता तिसरं कोणीतरी येणार होतं. दोघाचाही आनंद गगनात मावेना. तिच्या कोड-कोतुकाचे दिवस चालू होते.

ती दोघे घरापासून दूर राहत असल्यामुळे तिची काळजी घेणारं 'तो' सोडला तर जवळचं असं कोणी नव्हतं. नातेवाईक दूर. सांगणार कोणाला? स्वतःचे डोहाळे स्वत:लाच पूर्ण करावे लागत होने. कधीतरी तिच्या ताईचा फोन यायचा . "का गं? काय खाऊ वाटतंय? तिखट की गोड?" ती लाजून म्हणायची " काय सांगू ताई.. झणझणीत खायची इच्छा होतेय गं. "बयो.. लक्ष्मी येतेय वाटतं तुझ्या घरी.. " फिरकी घ्यायला ताई कमी नव्हती.

दिवस जात होते. सगळ्यात जास्त तिला डोहाळे लागले ते आईच्या हातच्या वरण-भाताचे. वडिलांच्या काळजीमुळं आईला कुठे जाता येत नव्हतं. तिला बोलवावे तरी कसं. सांगू तरी कसं. उगीच तिला एवढे पण आपण लेकीसाठी  करू नाही शकलो त्याची रुखरुख लागायची.

तश्यातच दिवाळीचा सण आला. दोघांनाही वाटलं, बरेच दिवस झाले होते गावी जाऊन. परत लवकर जाता पण येणार नव्हतं. तीही खूष होती. आई-वडीलांना तब्बल चार महिन्यांनंतर ती भेटणार होती. पण तरी तिला त्याच अप्रूप नव्हतं. ती खूष होती कारण आपल्या पिल्लाचं मागणं पूर्ण करायची अनायसे एक संधी चालत आलेली म्हणून.

रस्ते खराब. तिचा नवरा तसा कडकच. त्याला काही बोलायला ती बिचकायची. आईला बोलवावे तर भला मोठा गोतावळा तिच्या मागं. आनंदावर विरजण पडावं तसेच काहीतरी झाले. दिवाळीला तिला माहेरी काही जाता आले नाही.

प्रवासामुळे , दगदगीमुळे आणि नोकरीवरचा ताण. ती गावावरून आली तशी आजारी पडली. खोकला-पडसं काही केल्या जाता जाईना. त्यातच एक दिवस तिनं खूप काम केलं. जड सामान उचलायचं नाही हे तिच्या लक्ष्यातच नाही आलं. एक-दोन दिवस उलटून गेल्यावर तिच्या पोटात दुखायला लागलं. एक-दोन दिवस तिनं दूर्लक्ष केलं. नवऱ्यालाही तिनं सांगितलं. त्याला तरी काय कळणार. एक-दोन दिवस वाट बघू एवढेच तो बोलला.

डॅाक्टरांनी पाहिल्यावरच कामाच्या ताण खूप पडलाय, आरामाची गरज आहे सांगितले. आराम करेल ती कसली. परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्यांच्या काळजी करण्याच्या स्वभावामुळे, आराम करायचं सोडून धावपळ करण्यामुळे तीला bleeding चालू झालं.हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करावं लागलं. डॉक्टर बोलले गर्भपाताची शक्यता आहे. ५०-५०% chances आहेत. तरी आपण प्रयत्न करु. दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. एवढे दिवस एक स्वप्न उराशी बाळगून होती ती दोघं. दोघांनी एकमेकांना धीर दिला. दोघांना एकमेकांना शिवाय होतंच कोण?

त्यानं दोघांच्याही घरच्यांना बोलावून घेतलं. आधाराची गरज तिच्याएवढीच त्यालाही होती. तो धीर देत तिला बोलला.. "बाळाच काही नाही .तु वाचली पाहिजे." पहिल्यांदा तिला जाणवलं त्याच्यातल्या हारलेला माणूस.

दुसया दिवशी तिची आई आली. कधीही साधी सलाईन सुद्धा
न लावलेल्या मुलीला, ICU मध्ये अश्या अवस्थेत बघून ती घाबरली. पण त्यावेळी लेकीपेक्षा जावयाला धीर देणं गरजेचं होतं. धीर द्यायला लेकीला तशीही शुदध होतीच कुठे? तिला शुध्द आल्यावर आईनं विचारलं, "काय आणू खायला? तुला आवडतो तसा उपमा आणू?". "आई, जमलं तर वरण-भात आणशील?"

 दुसया दिवशी तिच्या सलाईन नी भरलेला हात पाहून आई तिला घास भरवणारच तेवढ्यात ती आईला म्हणाली "हयांना आत पाठवते का ग? " नवरा आत आल्यावर ती त्याला विनंती करून बोलली. "मला हा 'वरण-भात' खाऊ घाला, Please. मला तुमच्या हातूनच खायचं आहे". तो आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. आई असताता मला का बोलावलं हिनं? 'तुम्हीच खाऊ घाला, Pleare". ती परत एकदा त्याला बोलली. त्यानं पहिला घास भरवल्यानंतर तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले.

तो तिला धीर देत होता. " होईल गं सगळं ठीक". ती हारली होती. पण समाधानी झाली होती. शेवटाला का होईना तिच्या पिल्लाचे डोहाळे, त्याचं मागणे तिनं पूर्ण केलं होतं. त्याच्या वडिलांच्या हातून भरवलेला तो वरण-भाताचा घास आज तिला सगळ्या सुखांसमोर अनमोल वाटत होता. बाळ वाचेल की नाही तिला माहित नव्हतं. पण त्याची ईच्छा पूर्ण केल्याचं समाधान मात्र तिच्या चेहर्यावर होतं.

                                                    

Popular posts from this author